कुरणवाडी (आष्टी) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ पासून सुरू होणारा हा सप्ताह शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या सप्ताहामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून जाणार असून भाविकांसाठी हा एक आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
या सप्ताहात दररोज पहाटे काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होऊन सकाळी ग्रंथ वाचन, दुपारी हरिनाम भजन, सायंकाळी प्रवचन आणि रात्री कीर्तन व हरिजागर असे पारंपरिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वारी परंपरेचा गोडवा आणि संत साहित्याचा संदेश यामधून भाविकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
सप्ताहादरम्यान राज्यातील नामांकित कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ह.भ.प. गोवर्धन मोरे महाराज, ह.भ.प. एकनाथ महाराज कदम, ह.भ.प. प्रसाद महाराज राजुरकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज तन्मोरे, ह.भ.प. आंधळे महाराज, ह.भ.प. श्यामकाका महाराज डंके, तसेच ह.भ.प. शिवाजी महाराज हारकळ यांसारख्या मान्यवरांचे कीर्तन व प्रवचन या सप्ताहाची शोभा वाढवणार आहे.
सप्ताहाचा समारोप विशेष कळ्याचे कीर्तन आणि हरिजागराने होणार असून या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या निमित्ताने गावात सामाजिक ऐक्य, भक्ती आणि संस्कारांचे वातावरण निर्माण होणार आहे.
या भव्य धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व परिश्रम श्री. सतीश गणपत कदम यांनी घेतले असून त्यांचे विशेष कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. तसेच श्री. ह.भ.प. गणपत तुकाराम कदम व सर्व परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे. कुरणवाडी, आष्टी आणि तेंलगवाडी भजनी मंडळांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
सप्ताहाच्या माध्यमातून युवकांना अध्यात्माची गोडी लागावी, समाजात सकारात्मक विचार रुजावेत आणि संत परंपरेचा वारसा पुढे जावा, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या भक्तिमय सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
