सोलापूर | प्रतिनिधी
उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण परिसरातील एका शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणी तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि इतर सहकाऱ्यांविरोधात सोलापूर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी छावा संघटनेचे अॅड. योगेश नागनाथ पवार यांच्या माध्यमातून सादर केली.

तक्रारीनुसार, तक्रारदार राजाराम बनसोडे यांच्या मालकीची गट क्रमांक २००/१ मधील सुमारे ११ एकर ८ गुंठे शेतजमीन काही व्यक्तींनी संगनमत करून कमी किमतीत व्यवहार करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधितांनी सुरुवातीला दीड कोटी रुपयांचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष व्यवहार करताना केवळ ५० लाख रुपये देण्यात आले आणि उर्वरित रक्कम जमीन हस्तांतरानंतर देण्यात येईल असे सांगण्यात आले. जमीन नावावर झाल्यानंतर मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
यानंतर हीच जमीन काही महिन्यांतच मोठ्या किंमतीत दुसऱ्या नावावर विकण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या व्यवहारात जमिनीवर डाळिंब बाग, विहीर, बोरवेल, शेड आणि गोठा असल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये करण्यात आला. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये अशा कोणत्याही सुविधा नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासकीय बाजारमूल्यापेक्षा अनेक पटींनी अधिक रक्कम दाखवून आर्थिक गैरव्यवहार आणि काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, त्यांनी वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर संबंधितांकडून धमक्या देण्यात आल्या. जादूटोणा करून कुटुंब उद्ध्वस्त करण्याची भीती दाखवण्यात आली तसेच जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि राजकीय पाठबळामुळे आतापर्यंत उघडपणे तक्रार करण्यास भीती वाटत असल्याचेही तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले.
या प्रकरणात अशोक खरात, कल्पना खरात, शुक्राचार्य कोल्हाळ, रणजित कोल्हाळ, रविकिरण नगाणे आणि गणेश मलपे यांच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, धमकी देणे, कट रचणे तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू करावी, अन्यथा छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अॅड. योगेश पवार यांनी दिला आहे. या तक्रारीमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, आता पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
