- सोलापूर | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सांगता मिरवणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाविरुद्ध सोलापूर शहर पोलिसांनी कडक पाऊल उचलत मोठी कारवाई केली. परवानगीशिवाय डॉल्बी सिस्टीमवर कर्कश आवाजात गाणी वाजवणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तब्बल २० लाख ७० हजार रुपये किमतीचे साहित्य व वाहन जप्त करण्यात आले आहे.

१९ एप्रिल रोजी शहरात जयंती सांगता मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र, त्याआधीच पोलिस प्रशासनाने सर्व मंडळांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा वापर करु नये तसेच ध्वनीप्रदूषण होईल अशा पद्धतीने गाणी वाजवू नयेत. १५ एप्रिल रोजी पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात मनाई आदेशही जारी केले होते.
तरीदेखील मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पार्क चौक या मार्गावर सरस्वती चौकातील आम्रपाली बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून नियमांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात हिंदी व मराठी गाणी वाजवण्यात आली. पोलिसांनी तात्काळ सूचना देऊनही संबंधितांनी आदेशाचे पालन केले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी कपिल सुरवसे, आकाश वामणे, साजन गायकवाड, आदित्य सोनकांबळे, बाबू घागरे, अविनाश गायकवाड तसेच डॉल्बी मालक प्रेम संजय पवार (पिंपरी-चिंचवड) यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी चार बेस, चार टॉप, एक मिक्सर, दोन अॅम्प्लिफायर, एक पॉवर ट्रॉली आणि अशोक लेलँड दोस्त हे वाहन असा मुद्देमाल जप्त केला. या साहित्याची एकूण किंमत सुमारे २०.७० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही धडक मोहीम राबवली असून, पुढील तपास सुरू आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा इशारा
सण-उत्सव साजरे करताना कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यातही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
