नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका येथे आज मोठी लाचलुचपत विरोधी कारवाई उघडकीस आली असून अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कडे गायकवाड यांच्याविरोधात लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत महापालिका मुख्यालयात ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कामासाठी ४२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताच ACB पथकाने तत्काळ छापा टाकून गायकवाड यांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आवश्यक पंचनामा करण्यात आला असून पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरणी पुढील तपास सुरू असून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आ
हे.
